इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ८२ ठार   

देईर अल-बलाह, (गाझा पट्टी) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्य पूर्व दौरा संपताच गुरूवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळी इस्रायलने गाझा पट्टीसह देईर अल-बलाह आणि खान युनूस शहरावर हवाई हल्ला केला. यात ८२ जण ठार झाले. इंडोनेशियन रुग्णालयात ४८ मृतदेह आणण्यात आले आणि १६ मृतदेह नासेर रुग्णालयात नेण्यात आले. 
 
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, आम्ही गाझामधील युद्ध थांबवू शकत नाही. बेंजामिन नेतान्याहू यांच्या या वक्तव्यामुळे हमाससोबत संघर्षबंदी होण्याची कसलीही शक्यता नाही.  शुक्रवारच्या हवाई हल्ल्यावर इस्त्रायल सैन्याने बोलण्यास नकार दिला. या हल्ल्यांमुळे जबलिया निर्वासित छावणी आणि बेत लाहिया शहरातून नागरिक पळून गेले. 
 
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये १३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आधीच सांगितले आहे की, हमासचे उच्चाटन करण्याचे त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी ते गाझामधील हल्ले तीव्र करतील. दरम्यान, इस्रायलच्या मंत्रिमंडळाने शुक्रवारी कतारमध्ये झालेल्या वाटाघाटींचे मूल्यांकन करण्यासाठी आणि पुढील पावले उचलण्यासाठी बैठक घेतली.  
 
हमासच्या नेतृत्वाखालील दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी दक्षिण इस्रायलमध्ये घुसखोरी करून १ हजार २०० नागरिकांची हत्या केली, त्यानंतर   युद्ध सुरू झाले. इस्रायलच्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यात आतापर्यंत ५३ हजारहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. १८ मार्च रोजी इस्रायलने युद्धबंदी तोडल्यापासून जवळजवळ ३ हजार नागरिक मारले गेले आहेत. २५० पैकी ५८ इस्रायली ओलिस अजूनही हमासकडे आहेत, त्यापैकी २३ अजूनही जिवंत असल्याचे सांगण्यात येते. 
 

Related Articles